धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेमध्ये विषय शिक्षक मिळावा, शालेय पोषण आहारामध्ये आळ्या आढळल्याने गुत्तेदारावर कारवाई करावी. या मागण्या आमदार कैलास पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. त्यावर मंत्री भुसे यांनी तत्काळ शिक्षक देऊ व शासकीय शाळामध्ये सुविधा देण्याचा शब्द यावेळी दिला. 

आमदार पाटील म्हणाले की, शहरातील शाळामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा विचार होतो. तसेच ग्रामीण भागात सुद्धा सीसीटीव्ही बसवणे गरजेचं आहे. त्या अगोदर शाळामध्ये शौचालयची व्य्वस्था करणं आवश्यक आहे. याशिवाय जिल्ह्यात 54 जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी नववी व दहावीचे शिक्षण घेतात. पण या शाळेमध्ये विषय शिक्षक दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका बाजूला अतिरिक्त शिक्षक असताना दुसरीकडे आवश्यक ठिकाणी ते मिळत नाहीत असा विरोधाभास पाहायला मिळत आहे. याशिवाय आमदार पाटील यांनी एका गंभीर विषयाकडे सभागृहाच लक्ष वेधले. 


कंत्राट रद्द करण्याची मागणी

विद्यार्थी वर्गासाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क आळ्या आढळून आल्या आहेत. तरीही त्या गुत्तेदाराचे कंत्राट रद्द केलेले नाही. एका बाजूला आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये निकृष्ट जेवण दिल्यावरून एका आमदारानी तक्रार दिली तर तिथं दुसऱ्या दिवशी ती कॅन्टीन बंद करून त्याची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी होते. मात्र सामान्य विद्यार्थी यांच्या आहारात थेट आळ्या येऊनही त्याची गंभीर दखल घेतली जात नसेल तर असा भेदभाव का असाही मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला. 


शिक्षणमंत्री यांनी दिले आश्वासन

यावर उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळामध्ये आवश्यकता व पटसंख्येनुसार विषय शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. पोषण आहाराबाबत मी स्वतः वृत्तवाहिनीवरून हा प्रकार पाहिल्यावर अधिकारी यांना योग्य सूचना दिल्या होत्या. यापुढेही असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा परिषद शाळामध्ये सर्व भौतिक सुविधेसह अन्य चांगल्या सोयी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका वर्षानंतर हे चित्र बदलेल दिसेल. असा शब्द मंत्री भुसे यांनी सभागृहात दिला.

 
Top