धाराशिव (प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मिळावे या व इतर मागण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पुकारलेल्या बंदला धाराशिव जिल्ह्यात  उत्स्फूर्तपणे भरघोस  प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील खाजगी  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  शाळा सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

धाराशिव जिल्ह्यात अंशतः अनुदानित माध्यमिक 42 व उच्च माध्यमिक 51, इतर प्राथमिक  शाळा आहेत. त्या शाळांना  वाढीव 20 टक्के टप्पा अनुदान मिळावे  म्हणून जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. 

अंशतः अनुदान मागण्या बरोबर इतर मागण्या संघटनांनी केल्या होत्या त्या पुढील प्रमाणे आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी. सर्व शाळांना १00% अनुदान मिळावे.१५ मार्च 202४ चा संच मान्यतेचा जाचक शासन अध्यादेश त्वरित रद्द करावा. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तात्काळ समायोजन करावे. शाळांना वेतनेत्तर अनुदान लवकर द्यावे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती  रद्द करावी आदी मागण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी शाळा बंद करण्यात आला होत्या. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी काळात बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असाही शिक्षक समन्वय संघाने इशारा दिला आहे.

 या आंदोलनात संस्थाचालक संघटना धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ, मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र शिक्षक परिषद, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व इतर शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी सहभाग घेतला होता.

 आंदोलनात संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील,सचिव लहू लोमटे, धनंजय शिंगाडे,लिंबराज टिकले, पांडुरंग लाटे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,सचिव अनंत सूर्यवंशी, सहसचिव राजेंद्र मडके,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे, जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, जिल्हा सरचिटणीस  राजकुमार मेंढेकर, उपाध्यक्ष संभाजी गायकवाड,शहराध्यक्ष प्रा.राहुल पाटील, मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, कार्याध्यक्ष डी. के. भोसले, तालुका अध्यक्ष सुधीर दराडे, शहराध्यक्ष व्यंकट पाटील, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अनिता पाटील,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खैरूद्दीन सय्यद, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ दहिफळे आदी पदाधिकाऱ्यासह अनेकांनी शाळा बंद चे नेतृत्व केले होते.


 
Top