गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: |

गुरू: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवेनम: ||

   प्रत्येक वर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सन 2025 मध्ये ही गुरुपौर्णिमा 10 जुलै 25 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी वेदव्यासांना सर्व जगताचे गुरु म्हणून त्यांची पूजा केली जाते. व्यासांनी आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथरचना केल्या. त्या सर्व ग्रंथ रचना आजही त्याच तत्परतेने मानवाचे कल्याण करत आहेत. व्यासांनी सर्व संस्कृतीचे सार असलेला महाभारत हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला पंचम वेद असे म्हणतात. व्यासांचे वैदिक व लौकिक ज्ञान अतिशय अमर्याद होते. त्यांनी वैदिक अनेक ग्रंथ लिहिले त्यामुळे समाजातील अनेक व्यक्तीचा उद्धार झाला आहे, होत आहे आणि होणार आहे. महाभारताबद्दल बोलताना असे म्हटले जाते की जे ज्ञान महाभारतात आहे, तेच ज्ञान तिन्ही लोकांमध्ये आहे. त्याचे वितरित कुठलेही ज्ञान जगात नाही. त्यामुळे सर्व लोक कृतज्ञतापूर्वक म्हणतात की हे सर्व जगत  'व्यासोच्छिष्ट जगत सर्वं'. महाभारत ग्रंथाला 'विश्वस्य सारम्' असे म्हटले आहे. व्यास हेच समाजाचे खरे गुरु आहेत. म्हणून प्रत्येक वर्षी  आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होत आहे. 

      आई माझा गुरू आई कल्पतरू |

      सर्व सुखाचा सागरू आई माझी || 

        आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई आणि वडील हे आपले प्रथम गुरु असतात. कवी आईला कल्पतरूची उपमा देतो. आईला सुखाचा सागर असे म्हटला आहे कारण जीवनात सर्व आपले जीवन सर्वांगाने शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक इत्यादी सर्वांगानी आपणाला शिकवत राहते. आदर्श माता आपल्या आपल्या बालकावर गर्भापासूनच संसाराला चालू करते. संत तुकडोजी महाराज मातेचे याबद्दल पुढील शब्दात उपकार मानतात. 

       विद्यागुरुहुनि थोर |आदर्श मातेचे उपकार |

       गर्भापासोनि  तिचे संस्कार |बालकांवरी ||

                                   संत तुकडोजी महाराज. 


 विद्यार्थ्यांच्या जीवनात मातेनंतर वय वर्ष 5 ते 25 या कालावधीमध्ये शाळेतील गुरुजी त्याच्यावर शिक्षण आणि संस्कार देण्याचे कार्य करतात. आपले राष्ट्र ओजस्वी आणि तेजस्वी करण्याची ताकद विद्या गुरु मध्ये आहे. गुरुजींनी विद्यार्थ्याला शिकवत असताना आपला स्वतःचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना धडे द्यावेत. शाळेतील गुरुजी जेंव्हा हे कार्य करतील तर आपला देश जगामध्ये नंबर एक वर यायला वेळ लागणार नाही .तसा विचार केल्यास संस्काराच्या दृष्टीने आपण आजही नंबर एक वरच आहोत. संत तुकडोजी महाराज गुरुजी कडून अशी अपेक्षा  करतात. 

    गुरुजनी  ऐसे द्यावेत धडे |आपला आदर्श ठेवोनी पुढे |

    विद्यार्थी तयार होता चहुकडे | राष्ट्र होईल तेजस्वी|

             संत तुकडोजी महाराज. 

 संत महात्मे हे समाजाचे व जगताचे गुरु असतात. संत जातीय व्यवस्था कधीही शिकवत नाहीत तर ते समाजामध्ये ऐक्य कसं राहील आणि संपूर्ण मानव जातीने कसं वागलं पाहिजे याचा हितोपदेश करतात. उपदेश करत असताना ते अगोदर त्याप्रमाणे वागतात आणि नंतरच उपदेश करतात संत मागणे गुरू बद्दलचे कृतज्ञता व्यक्त करताना खालील शब्दात व्यक्त करतात. 

       ॐकार स्वरुपा सद्गुरू समर्था |

       अनाथाच्या नाथा तुज नमो || संत एकनाथ महाराज 

     

      गुरू तेथ ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन |

       दर्शनी समाधान |आधी जैसे  || संत ज्ञानेश्वर माऊली 

  

       सद्गुरू सारीखा असता पाठीराखा |

        इतरांच्या लेखा काय वानु || संत ज्ञानेश्वर माऊली

 

 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |

 आता उद्धरलो गुरु कृपे || संत ज्ञानेश्वर माऊली


 मोह जाळ माझे कोण निरसिल |

तुज वीन दयाळा सद्गुरू राया ||संत एकनाथ महाराज

    या विश्वामध्ये कोणीही पूर्ण ज्ञानी नाही आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठ जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता असते. गुरुचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये मंत्र गुरू, पृच्छक गुरु, मार्गदर्शक गुरु, विसर्जन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरू, वासल्य गुरु, योग गुरू इ. 

  मार्गदर्शन गुरु:- आपल्या शिष्याने जीवनामध्ये आदर्श मार्गक्रमण कसे करावे हे समजावून सांगणाऱ्या गुरूंना मार्गदर्शक गुरु असे म्हणतात. मानवाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक गुरूंना विशेष महत्त्व आहे. मार्गदर्शक गुरु शिष्यांच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. हे गुरु शिष्याला जीवन कल्याणाचा मार्ग समजावून सांगतात. यामध्ये गुरु आणि शिष्य एकमेकांमध्ये पूर्णतः एकरूप झालेले असतात. परंतु बऱ्याच वेळेला अनेक शिष्य गुरुने सांगितलेला अनुकूल असलेला उपदेश स्वीकारतात आणि प्रतिकूल असलेला उपदेश नाकारतात . गुरु अशा शिष्याचे मार्गदर्शक होऊ इच्छित नाहीत. ज्यावेळी शिष्य आपल्याला ना आवडती गोष्ट देखील गुरूंची ऐकत असेल तर अशा शिष्यालाच मार्गदर्शक गुरु लाभतात.गुरू पौर्णिमेच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा. 



ह.भ.प.बळीराम महादेव कवडे 

 ९६२३७४०९०१

शब्दांकन - विलास मुळीक कळंब

 
Top