धाराशिव (प्रतिनिधी)- बोगस बियाणे व खताबाबत कायदे कधीपर्यंत आणणार तसेच कंपन्याकडून दुबार पेरणीचा खर्च वसूल करून देणार का असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी विचारला. त्यावर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रश्नाचे गांभीर्यानी दखल घेऊन कायदे आणण्याची प्रक्रिया सुरु करु व सूचना केल्यानुसार योग्य ती कार्यवाही करणार असल्याच आश्वासन दिले. यावेळी विधानसभेत आमदार कैलास पाटील यांनी आक्रमकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. 

आमदार पाटील म्हणाले की, बोगस बियाण्या बाबत सरकार बियाणे परत देऊ असे म्हणत आहे. पण दुबार पेरणीसाठी खते, पेरणी व अनुषंगीक खर्च होतो. तो खर्च कंपनीकडून वसूल करणार का? असा प्रश्न आमदार पाटील यांनी विचारला. बोगस बियाणे व खाताबाबत नवीन कायदे लागू करण्याची नुसती चर्चा होते. पण प्रत्यक्षात त्याबाबत पुढे काहीच होत नसल्याचे आमदार पाटील म्हणाले. 2023 विधेयक क्रमांक 44, 45, 46, 47 ही चार विधेयक सभागृहासमोर ठेवण्यात आले. परत तो अहवाल संयुक्त समिती समोर मांडण्यात आला होता. दरम्यानच्या काळात सभागृह विसर्जित झाले. मात्र आता नवीन सभागृहाचे तिसरे अधिवेशन सुरु आहे. तरीही या कायद्याच्या निर्मितीसाठी काहीच हालचाल होत नसल्याचे वास्तव त्यांनी मांडली. 

यावर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की हा विषय गंभीर आहे. याबाबत कायदे करण्याची प्रक्रिया ही सुरु केली होती पण विधानसभा विसर्जित झाली. पण आता ही प्रक्रिया जलदगतीने राबवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे ही फाईल पाठवणार आहे. शिवाय पुढील अधिवेशनापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करु व आमदार यांच्या सूचनेनुसार या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.

 
Top