धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप 2024 मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानी पोटी धाराशिव जिल्ह्यातील 75677 शेतकऱ्यांना रु. 55 कोटी मिळणार असून यासाठी आवश्यक निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2024 मध्ये काढणीनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या 1000 कोटी निधीच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा. अजित पवार साहेब यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे खरीप हंगाम 2024 अंतर्गत काढणीपश्चात झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर रक्कम विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील 78812 शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या. पंचनाम्या अंती यातील 75677 पात्र शेतकऱ्यांना रु. 55 कोटी वितरित करण्यात येणार आहेत. ज्या अधिसूचित क्षेत्रात / मंडळामध्ये 25% पेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत, अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी रु.6200 ते रु. 6500 तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी रु. 8000 ते रु. 8500 दरम्यान नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपन्यांकडे हस्तांतरित केल्या नंतर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
राज्य शासनाला मिळणार 2,300 कोटींचा परतावा, ही रक्कम शेतकऱ्यांसाठीच वापरली जाणार
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या एकूण 7600 कोटींच्या हप्त्यातून, नुकसान भरपाई वगळता उरलेली रक्कम वजा करून 20% रक्कम ही विमा कंपन्यांना दिली जाते. या प्रक्रियेतून उरलेले सुमारे 2300 कोटी हे राज्य शासनाला प्राप्त होणार आहे. ही रक्कम पुनश्च शेतकऱ्यांसाठीच वापरण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शिल्लक रकमेचा त्यांच्या साठीच वापर ही प्रक्रिया दूरगामी व अत्यंत लाभदायक ठरणार आहे.