धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला बळ देण्याच्या दृष्टीने दोन नव्या मंडळाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली. धाराशिव शहर मंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, तर लोहारा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित शिंदे हे यापूर्वी धाराशिव नगरपरिषदेचे अध्यक्ष राहिले असून, त्यांना प्रशासनाचा अनुभव व संघटन कौशल्य आहे. तर राजेंद्र पाटील हे ग्रामीण स्तरावर सक्रिय असून, त्यांनी सातत्याने पक्ष कार्यात सहभाग घेतला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे नवीन अध्यक्षांना मन:पूर्वक अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी अथक परिश्रम घ्याल, असा पूर्ण विश्वास आहे. नवीन अध्यक्षांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या संघटनात नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

 
Top