धाराशिव (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आरपीआय (खरात) धाराशिव जिल्हा शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. दोषींवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून मोका व जन सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केली
13 जुलै रोजी गायकवाड अक्कलकोटमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित असताना, भाजपशी संबंधित दीपक काटे व सहकाऱ्यांनी शाईफेक करत जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचा दावा केला गेला. प्रमुख आरोपी दीपक काटे हा सराईत गुन्हेगार असून, जानेवारी 2025 मध्ये पुणे विमानतळावर त्याच्याकडे जिवंत काडतुसे सापडली होती, तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारवर गुन्हेगारांना राजकीय आश्रय देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पक्षपात न करता तत्काळ कारवाई करावी, यावेळी निवेदनावर आरपीआय (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष संपत सरवदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.