धाराशिव,(प्रतिनिधी)- माहिती तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असल्यामुळे सांस्कृतिक संकल्पना प्रचंड गतीने बदलत आहे. याबदलामुळे भारतीय संस्कृतीची मूल्ये मोडीत निघत असून, नवसमाज मूल्ये बाळसे धरायला लागली आहेत. भारतीय संस्कृतीचा कणा म्हणून कुटुंब व्यवस्थेकडे पाहिले जाते. कुटुंब व्यवस्था मोडीत निघण्याच्या या काळात युवकांच्या समृद्ध लेखनातून अक्षर चळवळीतून नव समाज निर्मिती शक्य होईल; असे मत अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय गिरासे यांनी व्यक्त केले. धाराशिव येथील कलाविष्कार अकादमी, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था व अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथा स्पर्धेतील विजयी स्पर्धक साहित्यिक, गुणवंत साहित्यिक शिक्षक, इयत्ता दहावी - बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी यांच्या अभिनंदन सोहळ्यात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. कलाविष्कार अकादमीचे मल्हारी माने, ॲड विद्युल्लता दलभंजन, नितीन बनसोडे, डी जी कुलकर्णी, महेश उंबरगीकर, वर्षा नळे समूहाच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, साहित्य भारती प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष डॉक्टर रविंद्र बेंबरे, रा.प. महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांनीही समयोचित उद्बोधक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाविष्कार अकादमी, बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे यांनी करताना गुणवंतांचा सत्कार करुन सार्वजनिक रित्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे हे सकस समाज निर्मितीसाठी आवश्यक असते व गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम आपण करत आहोत असे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी राजेंद्र अत्रे, शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने, साहित्य भारतीचे कार्यवाह रविंद्र शिंदे, बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यवाह समाधान शिकेतोड, प्राचार्य प्रशांत चौधरी, शंकरराव नळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हनुमंत पडवळ, कृष्णा साळुंके, युसुफ सय्यद, अविनाश मुंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांच्यासह विद्यार्थी , शिक्षक व पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा समितीचे जिल्हा सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले, तर हनुमंत पडवळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगाता कलाविष्कार चे मुकुंद पाटील यांच्या पसायदानाने झाली.