धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे भाजपच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री सगळ्याचे बाप आहेत. त्यामुळेच डीपीडीसीच्या निधीला स्थगिती दिली. असे सांगितले होते. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार टिका करून डीपीडीसीचा निधी तुमच्या घराचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून चांगले राजकारण पेटले असताना बुधवार दि. 11 जून रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री हे कोणाचाही बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो. आपणही मुख्यमंत्री होतो. याबाबत मी नितेश राणे यांच्याशी बोललो आहे. त्यांना समज दिली आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया राणे यांनी दिली. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे धाराशिव विमान तळावर आगमन होताच भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲड. अनिक काळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते  तुळजापूरकडे रवाना झाले. राणे यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म, कुलाचार पार पाडत भाविकतेने देवीची ओटी भरली. पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर राणे कुटुंबीय खास देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल झाले होते.

याआधी आठवड्याभरापूर्वीच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीदेखील तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे, त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबीयांनी मंदिरात उपस्थित राहून विधिवत दर्शन घेतले व देवीची ओटी भरली. यावेळी त्यांच्या सोबत विनोद गपाट, गुलचंद व्यवहारे, ॲड. अनिल काळे, आनंद कंदले आदी उपस्थित होते.  मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्यांची माळ व महावस्त्र भेट देत राणे दांपत्यांचा यथोचित सन्मान केला. जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर, पुजारी रामभाऊ छत्रे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top