धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात होताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. याशिवाय, खाजगी शिकवणी, देणग्या यासाठीही दबाव आणला जात आहे. या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फटका पालकांवर पडतो. या पार्श्वभूमीवर ‌‘सुराज्य अभियान' अंतर्गत धाराशिव जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम आणि भगवान श्रीनामे उपस्थित होते. असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. 

सुराज्य अभियानाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा स्वरूपाचे स्पष्ट आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून जारी व्हावेत. शाळांकडून या आदेशांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी केली जावी. आदेशांचे पालन न करणाऱ्या शाळांना सूचना दिल्या जाव्यात. तरीही अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशा तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि त्याचा व्यापक प्रसार करावा.


राज्यभरातील व्यापक प्रतिसाद व कारवाईची सुरुवात !  

‌‘सुराज्य अभियान' अंतर्गत आतापर्यंत जळगाव, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अकोला, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 13 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. जिल्हा स्तरावर अनेक अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कृतीचे आश्वासन दिले असून, काही ठिकाणी आदेश व सूचना पत्रे जारी करण्यात आले आहेत. बीडमध्ये, स्थानिक अधिवक्तेही अभियानात सक्रिय सहभागी झाले आहेत. सोलापूर आणि जळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन पालकांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशांची माहिती देण्यात आली.

 
Top