धाराशिव, (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रियेत पात्र ठरूनही नियुक्ती न मिळाल्यामुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत प्रमोद दयानंद भोसले या दिव्यांग उमेदवाराच्या वडिलांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३० जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दयानंद भोसले यांनी आपल्या मुलाच्या हक्कासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा केला असून, दिव्यांग कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनीही २१ जून २०२५ रोजी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून संबंधित उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवले असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या मुलाला झालेल्या परीक्षेत २०० पैकी ९० गुण मिळाले असून तो अंध प्रवर्गातील उमेदवार आहे. शासनाच्या नियमांनुसार दिव्यांग उमेदवारांना राखीव जागा असूनही या उमेदवारास नियुक्ती न मिळाल्यामुळे त्याच्या पालकांमध्ये संतापाची भावना आहे.
दयानंद भोसले यांनी यापूर्वीही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडे भेट देऊन निवेदन दिले होते. परंतु नियुक्तीसंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
“शासनाच्या धोरणांनुसार आणि आयुक्तांच्या स्पष्ट पत्रानुसार माझा मुलगा पात्र असूनही त्याच्या न्यायासाठी मला रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही शासन यंत्रणेची मोठी शोकांतिका आहे,” असे दयानंद भोसले यांनी सांगितले.या उपोषणाची माहिती शासनाच्या विविध अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, न्याय न मिळाल्यास न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.