धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा अभियांत्रिकीच्या ई टी सी विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा निरोप समारंभ आयोजित केला होता. कॉलेजचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने तसेच सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणूबन उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी ई टी सी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली.यावेळी अनुष्का मसलेकर हिने सुंदर स्वागत गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.
त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर ,सर्व शिक्षक वृंद आणि फायनल इयर चे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्यातील गुणवत्तेमुळे आणि कॉलेज मध्ये देण्यात येणाऱ्या अनेक ट्रेनिंग प्रोग्रॅम्स द्वारे वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यात सिलेक्ट होतात. यात दर वर्षी विभागातील अनेक विद्यार्थ्यांची कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राइव्ह मधून विविध नामांकित कंपनीत निवड होते. अशाच नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना प्राचार्य डॉ.माने यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन नोकरीसाठी उपलब्ध संधी विषयी माहिती दिली.विभाग प्रमुख डॉ.कोल्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी समयोचित मनोगत व्यक्त करत कॉलेजचे आणि सर्व स्टाफचे त्यांच्या जडणघडणीत हातभार लावल्या बद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ई टी सी विभागातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी चिवरे हिने केले तर प्रा.वंदना मैंदरगी यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे आणि प्रा.श्रीकांत अघोर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आणि खूप कमी वेळात एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला.याबद्दल या विद्यार्थ्यांचे प्राचार्य,सर्व विभागप्रमुख आणि सर्व स्टाफ यांनी कौतुक केले आहे.