धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका चार महिन्याच्या बाळावर अत्याचार करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात बाळाची आई व आरोपी पळून जात असताना पकडलेल्या नागरिकांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. पाच वर्ष या प्रकरणी सुनावणी झाली. 

सहाय्यक शासकीय अभियोग्यता ॲड. सचिन सुर्यवंशी यांनी सांगितले की, धाराशिव तालुक्यातील एका गावात पाळण्यामध्ये चार महिन्याच्या बाळाला झोपवून आई काम करीत होती. तेव्हा आरोपी धर्मराज मारूती कचरे (वय 50) हा तिथे आला. जवळपास कोणीही नसल्याचे पाहून बाळावर कचरे यांनी अत्याचार केला. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर तिची आई पाळण्याजवळ आली असता रक्त येवून बाळ जखमी झाल्याचे दिसले. तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला नेले. मात्र तेथे उपचार न झाल्यामुळे त्यावेळी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे बाळावर यशस्वी उपचार झाले. दरम्यान, अत्याचार करून कचरे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला त्याच गल्लीतील नागरिकांनी पकडून बेदम चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार 2019 मध्ये घडला. 

न्यायालयामध्ये सुनावणी झाली. या प्रकरणी 9 साक्षीदार तपासण्यात आले. बाळाची आई, परिसरातील नागरिक, वैंद्यकीय अहवाल, डॉक्टरांची साक्ष  या प्रकरणात महत्वाची ठरली. ॲड. सुर्यवंशी यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून बाल लैंगिक अत्याचार व ॲट्रासिटीनुसार आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

 
Top