भूम (प्रतिनिधी)- आपल्या महाविद्यालयातील विद्या विकास पाथरुड सेवक सहकारी पतसंस्था या नामांकित संस्थेच्या चेअरमनपदी डॉ. पडवळ एन. डी. आणि उपाध्यक्षपदी प्रा. काळे जी. सी. यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली. या दोन्ही मान्यवरांच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विद्या विकास मंडळ, पाथरुडचे उपाध्यक्ष डी. डी. बोराडे, सहसचिव प्रा. संतोष शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सत्कार समारंभात बोलताना उपस्थितांनी नवनिर्वाचित चेअरमन डॉ. पडवळ आणि उपाध्यक्ष प्रा. काळे यांच्या कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि संस्थेप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. “या नव्या नेतृत्वामुळे पतसंस्थेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमतेची वाढ आणि नवोन्मेषी उपक्रमांची अंमलबजावणी होईल,“ असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. आपल्या मनोगतात डॉ. पडवळ एन. डी. यांनी सर्व संचालक, पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले आणि संस्थेचा आर्थिक विकास, सभासदांचे हित आणि व्यावसायिक व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपाध्यक्ष प्रा. काळे जी. सी. यांनीही सहकार्याचे वचन देत संघभावनेने कार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष सचिव, संचालक मंडळातील सदस्य, कर्मचारी व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला.

 
Top