धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचारांमध्ये लागणारे मूलभूत साहित्य परवडणारे व्हावे. या उद्देशाने धाराशिव शहरात ‘रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र' सुरू करण्यात आले आहे. हा उपक्रम जिल्हा व्यापारी महासंघ, सहकार भारती, नितीन सर्जिकल, एकता फाउंडेशन आणि गणेश मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभा राहिला असून, समाजातील गरजूंना नवा आधार देणारा एक सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी नमुना ठरत आहे.
या केंद्रामार्फत रुग्णांना व्हीलचेअर, वॉकर, बेड, बायपँप, सक्शन मशीन, आँक्सिजन मशीन, आँक्सिजन सिलेंडर, बी.पी. मशीन, बेड साईड ट्राली या सारखे अनेक जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणे नाममात्र भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. उपचाराची साधनं विकत घेणं शक्य नसलेल्या कुटुंबांसाठी ही सेवा एक दिलासादायक ठरणार आहे. या सेवेमुळे समाजातील कोणताही व्यक्ती फक्त पैशाअभावी योग्य उपचारांपासून वंचित राहणार नाही, अशी आशा संबंधित संघटनांनी व्यक्त केली आहे. या केंद्राचे दैनंदिन व्यवस्थापन स्वयंसेवकांच्या मदतीने पार पडणार असून, 'सेवाभावातून समाजाशी ऋण फेडायचं आहे', अशी भावना कार्यकर्त्यांकडुन व्यक्त होत आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ वैद्यकीय मदत नव्हे, तर माणुसकीचं जिवंत उदाहरण आहे. अपेक्षित साहित्य मिळवण्यासाठी लक्ष्मीकांत जाधव, नितीन फंड, अभिलाष लोमटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.