धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अर्थात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत घडलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अशफत आमना, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरबत,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता पंडित जाधव व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सभेत बोलताना पुजार म्हणाले की, ॲट्रॉसिटी प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावी. पीडितांना वेळेत मदत करून त्यांना न्याय मिळवून द्यावा. या कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक आयुक्त अरवत यांनी सांगितले की, मार्च 2025 अखेर पोलीस तपासावर असलेल्या 40 प्रकरणापैकी 60 दिवसांची मुदत संपलेली 17 प्रकरणे होती. त्यापैकी 11 प्रकरणांचा दोषारोप अहवाल दाखल करण्यात आलेला नाही.6 मुदत संपलेल्या प्रकरणांचा दोषारोप अहवाल दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सन 2024-25 वर्षात एप्रिल 2025 अखेर ॲट्रॉसिटी कायदयाअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये 4 खून, 66 जातीवाचक शिवीगाळीची प्रकरणे, विनयभंगाची 25, बलात्काराची 14 आणि इतर 12 गुन्ह्याचा समावेश असून अशी एकूण 121 गुन्हे या कायद्याअंतर्गत घडली. न्यायालयात 78 प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आली. 26 प्रकरणे पोलीस तपासार प्रलंबित असून पोलीस स्तरावर निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या 17 इतकी आहे. माहे एप्रिल 2025 या महिन्यात एकूण 14 गुन्ह्याची प्रकरणे घडले. यामध्ये 8 जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग 2, बलात्काराची 2 प्रकरणे व इतर दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. अशी माहिती अरवत यांनी यावेळी दिली.