तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज देशभरातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीने पूजेसाठी लागणारे ओटीचे साहित्य विक्री करत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाच्या निदर्शनास आली होती.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांच्या सूचनेनुसार मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाने कारवाई करत मंदिर परिसरात अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत एकूण 21 पूजेची ताटे व एक फळ विक्रीचे कॅरेट जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अचानक धाड टाकून करण्यात आली असून, त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांना चाप बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंदिर परिसरातील शिस्त राखण्यासाठी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासन सातत्याने कार्यरत आहे. अनधिकृत विक्री करणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सुरक्षा विभागाने दिला आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची अनधिकृत विक्रेत्यांकडून फसवणूक होणार नाही आणि मंदिर परिसरातील सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता सुरक्षा विभाग घेत आहे.