धाराशिव (प्रतिनिधी)- भूम शहरात 29 मे रोजी झालेल्या सुमारे 9 लाख 62 हजार 110 रूपयांच्या चोरीप्रकरणी वाहन चालकाच चोर निघाल्याचे उघडकीस आले आहे. भूम पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अनिल पांडुरंगे बेदरे (रा. जामखेड) यांच्या गाडीतून हॉटेल शिवसेरी भूम समोरून सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम असे एकूण 9 लाख 62 हजार 110 रूपयांचा माल चोरीस गेला होता. बेदरे यांना आपला चालक रविंद्र परदेशी (रा. जामखेड)  याच्यावर संशय व्यक्त केल्याने त्याला ताब्यात घेवून सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे व विश्वासात घेवून केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी आपला साथीदार चंद्रकांत चव्हाण (रा. सावरगाव, ता. जामखेड) याचेही नाव उघड केले. त्यानुसार पोलिसांनी चंद्रकांत चत्तहण यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून मिळून 55 ग्रॅम सोने, 75 ग्रॅम चांदी व 1 लाख 50 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 8 लाख 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक धाराशिव रितु खोखर, पोलीस अधीक्षक धाराशिव शफकत आमना अप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस उपनिरीक्षक संजय जराड, प्रल्हाद सरोदे, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, संदेश क्षिरसागर, अरविंद डोके, चालक रत्नदीप डोंगरे यांनी संयुक्तपणे केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत.

 
Top