धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. 16 कोटी 54 लाख रुपये खर्चून कौडगाव एमआयडीसीत रस्ते व अन्य मूलभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे एक निर्णायक पाऊल पुढे पडले असून, धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीचे नवे पर्व सुरू झाल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
कौडगाव एमआयडीसीत 308 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी एमआयडीसीमार्फत एकूण 114 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पाइपलाइन, वृक्षारोपण व विद्युतीकरण आदी सुविधा समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 12.07 कोटींचा रस्तेविकास व उर्वरित रक्कम इतर खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत.
जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत कॉन्फरन्स
धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसी येथे प्रस्तावित “टेक्निकल टेक्सटाईल पार्क“ मध्ये देशी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने, एक विशेष राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत तांत्रिक वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तांत्रिक वस्त्रनिर्मितीत जगप्रसिद्ध असलेल्या असाही कासेई कॉर्पोरेशन (जपान),ड्यूपाँट डी नेमूर्स इंक. (अमेरिका),तेजिन लिमिटेड (जपान),एसआरएफ लिमिटेड (भारत),मिलिकेन अँड कंपनी (अमेरिका),फ्रॉइडेनबर्ग ग्रुप (जर्मनी),बेरी ग्लोबल ग्रुप (अमेरिका), किम्बर्ली-क्लार्क कॉर्पोरेशन (अमेरिका),आहलस्ट्रॉम-मुंक्षो (फिनलँड-स्वीडन),जॉन्स मॅनव्हिल (अमेरिका) या आघाडीच्या 10 कंपन्यांशिवाय, 24 इतर नामांकित देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही कौडगाव येथील तांत्रिक वस्त्र पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.यात सहभागी कंपन्यांना कौडगाव येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्क अंतर्गत उपलब्ध भौगोलिक व औद्योगिक सुविधा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.