भूम (प्रतिनिधी)-  देशातील भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्याच्या निमित्ताने शूर सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी व ऑपरेशन दरम्यान शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत पाकिस्तान विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. 

गुरुवार दि. 23 मे 2025 रोजी शहरातील सजग नागरिकांनी भव्य अशी तिरंगा रॅली काढून पाकिस्तान विरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी करण्यासाठी ज्या भारतीय सैनिकांनी कर्तव्य बजावले, विंग कमांडर व्योमिका सिंह व कर्नल सोफिया कुरेशी या धाडसी महिलांचे अभिनंदन कौतुक करण्यात आले. या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यामध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीय नागरिकांना व ऑपरेशन सिंदूर राबवत असताना जे भारतीय सैनिक शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसानच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. तिरंगा रॅलीमध्ये शहरातील माजी नगराध्यक्ष विजयसिंहराजे थोरात,  भाजपाचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, माजी तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , शहराध्यक्ष बाबासाहेब वीर,  काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, माजी सैनिक तालुका अध्यक्ष  हेमंत देशमुख, उबाठा शिवसेना तालुका प्रमुख अनिल शेंडगे, सुब्राव शिंदे, प्रदिप साठे, मुकूंद वाघमारे यांचेसह सर्वपक्षीय पदाधिकारी,  कार्यकर्ते,  विविध अकॅडमी, शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  या रॅली दरम्यान प्रत्येकाच्या हातात भारतीय तिरंगा दिसत होता. रॅली भूम नगर पालिका, गांधी चौक, बागवान गल्ली, बाजार रोड, लक्ष्मी रोड मार्गाने गोलाई चौक येथे आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप माजी सैनिकांना गुलाब पुष्प देऊन व राष्ट्रगीताने करण्यात आला.

 
Top