धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2023 -2024 या वर्षीचा गुणवंत अधिकारी,कर्मचारी गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केला. राज्यातील एकुण 34 अधिकारी व कर्मचारी यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली असुन, जिल्हा परिषद धाराशिव मधील सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले शैलेश निवृत्ती ताटे यांची निवड शासनाने केली आहे.
राज्य शासनाकडुन ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच केंद्र पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात अशा काही योजना /प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचा-यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पुर्ण करताना अधिकारी /कर्मचा-यामध्ये विशेष वैयक्तीक कौशल्य व गुणवत्ता आढळुन येते. अशा अधिकारी /कर्मचा-यांचा गौरव करण्याची योजना शासनाने सन 2005-2006 पासुन सुरु केली आहे.
छत्रपती संभाजी नगर विभागातुन तीन कर्मचा-यापैकी शैलेश निवृत्ती ताटे हे गुणवंत कर्मचारी गौरव पुरस्कार 2023-2024 साठी पात्र ठरलेले. जिल्हा परिषद धाराशिव मधील एकमेव वरिष्ठ सहाय्यक आहेत. शैलेश निवृत्ती ताटे यांची निवड झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी ताटे यांचा सत्कार केला. या वेळी सुर्यकांत भुजबळ उपमुख्य कार्यकारी (सा.प्र.) यांचे सह जिल्हा परिषद धाराशिवचे सर्व खातेप्रमुख,विभागप्रमुख व कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ताटे यांचा गुणवंत कर्मचारी म्हणुन गौरव करण्यासाठी दिनांक 27.05.2025 ही तारीख निश्चित केली असुन सदरचा गौरव समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,जनरल जगन्नाथ भोसले मार्ग मंत्रालयासमोर मुबई येथे आयोजीत करण्यात आला आहे. ताटे यांचा सपत्नीक प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. या निवडी मुळे ताटे यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.