कळंब (प्रतिनिधी)- शिक्षकांनी स्वतः चे नाव कमविण्यासाठी अध्यापनाचे कष्ट घ्यावे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी अतोनात अध्यापन कार्य करावी लागणार आहे. पालकांनी आपला पाल्य शाळेत दाखल करतेवेळी एक चिखलाचा गोळा म्हणून आपल्याकडे देतात. त्यावेळी शिक्षकांनी त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगातील सुप्त गुण जाणून घेऊन त्याला योग्य तो आकार द्यावा. अध्यापन कार्य करत असताना “जिथे युगो - तेथे घात“ हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. असे मत रणसम्राट क्रीडा मंडळ संचालित संचालक प्रा. राम मुळीक यांनी सहविचार तथा संवाद सभेच्या प्रसंगी केले.
शहरातील रण सम्राट क्रीडा मंडळची सर्व शाखेतील कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी यांची सह विचार तथा संवाद सभा सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. सभेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.पांडुरंग भवर (संस्थेचे उपाध्यक्ष) तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक प्रा.राम मुळीक, अध्यक्षा मनोरमाताई शेळके, सहसचिव भागवत सुरवसे, संचालक सूर्यकांत चव्हाण आदींची उपस्थिती होती.
प्रा. डॉ. पांडुरंग भवर म्हणाले की, प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी निगडीत सर्व जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात. अर्थातच शिक्षकांनी विद्यार्थ्याची आई होऊन त्याला समजून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यावर चांगले संस्कार होतील. समाजातील सर्वात मुख्य व पायाभूत घटक म्हणजे शिक्षक होय. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दातृत्व ची जाणीव ठेवणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. शिक्षण क्षेत्रातील वातावरण निर्मितीही विद्यार्थ्यांसह पालकातून करताना प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वतः पासून करावी. असे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग भवर यांनी मत व्यक्त केले.
या सहविचार सभा प्रसंगी रणसम्राट क्रीडा मंडळ संचालित सर्व शाळेतील मुख्याध्यापक काकासाहेब मुंडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.मीनाक्षी शिंदे, मुख्याध्यापक हरिश्चंद्र शेळके, छगनराव जाधव, सुलभा शिंदे, देवानंद साखरे यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. या सभेचे प्रास्तविक शंकर गोंदकर यांनी केले. तर सूत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत यांनी मानले.
शिक्षकांनी आपापसातील चांगले विचार एकमेकांना आदानप्रदान करून विद्यार्थ्याची प्रगती लक्षात घ्यावी. समन्वय, एकता व एक निष्ठा जपून अध्यापनाचे कार्य करावे.
- सूर्यकांत चव्हाण (संचालक).
प्रत्येक शिक्षकाने प्रथम त्या विद्यार्थ्याची आई व्हावी लागते. कारण आई ही एकमेव अशी असते की ती आपल्या मुलाच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणून घेते. त्याच प्रकारे शिक्षक ज्यावेळी विद्यार्थ्याची आई होतो,त्यावेळी त्याच्यातील सुप्त गुण शिक्षकच ओळखू शकतो आणि योग्य संस्कार करतो.
- मनोरमाताई भवर (अध्यक्षा).