धाराशिव (प्रतिनिधी)- आज अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील पदाधिकाऱ्यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. किरण झरकर, राजीव गायकवाड, मनोहर सूर्यवंशी, सखाराम जगताप, नंदकुमार पानसे, रतिकांत पवार, डॉ. विलास जोंधळे हे पदाधिकारी हजर होते. 

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने नुकतेच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण या संवर्गात राज्यात काम सुरू केले आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणीचे काम सुरू आहे. या महासंघाची 1988 रोजी स्थापना झालेली आहे. 24 राज्यात 35 राज्यस्तरीय आणि 50 विश्वविद्यालयीन विभागात या महासंघाचे कार्य सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात नव्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संवर्गात महासंघाने कार्य सुरू केले आहे. शिक्षकांच्या वेतन, भत्ते, सुविधा व सेवा नियम यासाठी महासंघ कार्यरत आहे. मुख्यत्वे शिल्प निदेशक यांच्या गुणवत्ता, प्रशिक्षण, संस्कार, संस्कृती यावर महासंघाचा भर आहे.

या विभागातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देण्यात आले. यात मिलरराईट मेंटेनन्स या पदावरील कर्मचाऱ्यांचा 10 वर्षाचा प्रलंबित लाभ देणे, 8/3/1999 पुर्वीच्या शिल्प निदेशकांच्या शासन निर्णयाप्रमाणे अभवीत सेवा नियमित करून त्यांना फरक देणे, आय टी आय च्या जागा इतर विभागांना हस्तांतरित होत असल्यास मुळ संस्थेची सोय झाल्याशिवाय त्या करू नयेत,आपसात विनंती बदली साठी ऑनलाईन सोय करावी  तसेच अल्पसंख्यांक, सार्वत्रिकरन, प्लॅन, एस.सी.पी. या सर्व योजनांची पदे नॉन प्लॅन मध्ये घ्यावीत म्हणजे त्यांचे वेतन वेळेवर होईल अश्या मागण्या मांडल्या. तसेच महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळाने त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.

यावेळी शिष्ट मंडळाशी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्व मागण्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शिक्षक हा देशाच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. आयटीआय  मधील शिल्पनिदेशकांची  व प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच प्रशिक्षणार्थी यांच्या प्रश्नावर महासंघाने प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले. या भेटीसाठी महासंघाचे प्रांतिक महासचिव प्रा. डॉ. वैभव नरवडे, गोपाळ महाजन, मुकुंद देशपांडे, अजय देशपांडे यांनी मार्गदर्शन व विशेष सहकार्य केले.

 
Top