धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022 चे ओबीसी आरक्षण कायम ठेवून घेण्यात याव्यात असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का न लागता या निवडणुका होणार असल्याने अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने धाराशिव शहरातील महात्मा फुले चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या कारणावरून रखडलेल्या आहेत. या निवडणुकामध्ये 2022 चे राजकीय आरक्षण कायम ठेवून निवडणुका घ्याव्यात. यासाठी अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री छगन भुजबळ, मा. खा. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सतत पाठपुरावा करण्यात येत होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सन 2022 च्या आरक्षणाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात. तसेच चार आठवड्यात अधिसूचना जारी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला असल्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत म्हणाले.
तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पेढे वाटून, फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष डोरले, कळंब तालुकाध्यक्ष प्रशांत वेदपाठक, धाराशिव तालुकाध्यक्ष रॉबीन बगाडे, शहराध्यक्ष व्यंकट जाधव, मनोज वाघमारे, नंदकुमार कुऱ्हाडे, भजनदास जगताप, तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, शशिकांत महामुनी, महेश लोकरे, प्रवीण क्षीरसागर, वैभव वाघमारे, अजिंक्य खुणे, विशाल क्षीरसागर यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.