धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मनोज रणधीर देशमुख यांनी केली आहे. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे की धाराशिव शहरात मटका, गुटखा, पत्त्यांचा क्लब, ऑनलाईन चक्री जुगार, मद्यविक्री व अन्य गैरकायदेशीर व्यवसाय जोरात सुरू असून, धाराशिव शहर पोलिसांनी या कडे अर्थपूर्ण डोळेझाक केली आहे,त्यामुळे शहरातील युवक व विद्यार्थी वर्ग मजूर बिघडत आहे. शिक्षण सोडून काही युवक गुन्हेगारीकडे वळत असून, याचा विपरीत परिणाम समाजव्यवस्थेवर होत आहे तर सामान्य नागरिक ऑनलाईन चक्री जुगाराच्या नादी लागून संसार उध्वस्त करून घेत आहे त्यामुळे अनेक वेळा हनामाऱ्यांच्या घटना देखील घडल्या आहेत.
“या प्रकारांमुळे महिलांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी असुरक्षितता वाढली आहे. विशेषतः बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहाल टॉकीज परिसर,देशपांडे स्टँड भाजी मंडई, गणेश नगर मसोबा परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील परिसर व महावितरण कार्यालयाच्या आसपासचे भाग हे अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू बनले आहेत, तर बालाजी नगर परिसर, मुल्ला पट्टा, सोलापूर-औरंगाबाद बायपास रोड वरती कचरा डेपो जवळ असलेल्या मंगल कार्यालय (हॉटेल/ ढाबा) मागील परिसरात सुरू असलेले पत्त्यांचे क्लब तत्काळ कारवाई करून बंद करण्यात यावे, असे देशमुख यांनी नमूद केले आहे. या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तातडीने आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी देशमुख यांनी निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे.