धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित लाभासाठी लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्यात येणार आहे.या अनुषंगाने 1 मे ते 15 मे 2025 दरम्यान जिल्हाभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सध्या 11.23 लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी 5.76 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड आधीच तयार करण्यात आले आहे.उर्वरित पात्र नागरिकांचे कार्ड तयार करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यांना दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाखांपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा मिळते. 1356 आजारांवरील उपचार जिल्ह्यातील 18 खासगी व 12 शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच राज्यभरातील सुमारे 1900 रुग्णालयांत उपलब्ध आहेत.

या मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर 'आपले सरकार सेवा केंद्र', केंद्र,आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून मोफत ई-केवायसी व कार्ड निघणार आहेत.याशिवाय नागरिकांनी ‌‘आयुष्मान भारत ॲप' डाऊनलोड करून त्यातील ” या पर्यायावर क्लिक करून स्वतःचे ई-केवायसी करता येईल.

गाव,वाडी,वस्ती,शाळा,महाविद्यालयांमध्ये जाऊन ही सेवा देण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.मोहीम जून 2025 अखेरपर्यंत 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने राबविली जात आहे.यासाठी सर्व विभागांमधील समन्वयाने गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

 
Top