भूम (प्रतिनिधी)- 'रस्त्याचे काम करावे या मागणीसाठी आरसोली येथील ग्रामस्थांनी दि 1 मे महाराष्ट्र दिनी भूम येथील उपविभागीय कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भूम तालुक्यातील आरसोली, देवळाली, तांबेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी गेल्या काही काळापासून ग्रामस्थांनी जोरदार पाठपुरावा करत आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे प्रशासनाला जाग आली असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यामुळे आत्मदहनाचा करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
17 एप्रिल 2025 रोजी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन 1 मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे उपअभियंता सय्यद अजहरोद्दीन यांनी स्पष्ट केले की, सद्यस्थितीत निधी उपलब्ध नसल्यामुळे काम सुरू करता येणार नाही. मात्र, 2025-26 या आर्थिक वर्षात विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत रस्त्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, भूम यांनी तातडीची गरज लक्षात घेऊन, इतर योजनांतून विशेष बाब म्हणून 60 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. उप अभियंता डी.आर. पाईकराव यांनी या प्रस्तावासोबत अंदाजपत्रकही जोडले असून, संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाकडून ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आत्मदहनासारख्या टोकाच्या निर्णयांपासून दूर राहावे व प्रशासनास सहकार्य करावे. सध्यातरी प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत असून, लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.