परंडा (प्रतिनिधी)- दि.11 फेब्रुवारी 2026 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आज युनानी डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.आबरार पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. 

या प्रसंगी युनानी विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.हाश्मी अब्दुल वदुद यांनी युनानी पॅथी चिकित्सेविषयी सविस्तर मार्गदर्शन करत जनतेमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण केली.


युनानी पॅथी म्हणजे काय?

युनानी वैद्यकशास्त्र ही प्राचीन ग्रीक परंपरेतून विकसित झालेली आणि पुढे अरब व पर्शियन विद्वानांनी समृद्ध केलेली उपचार पद्धती आहे. मानवाच्या शरीरातील चार प्रमुख द्रव्ये दम (रक्त), बलगम, सफरा (पित्तसदृश) आणि सौदा यांच्या संतुलनावर आरोग्य अवलंबून असते, अशी युनानीची संकल्पना आहे.


उपचारांची त्रिसूत्री

डॉ. वदुद यांनी युनानी पद्धतीतील तीन महत्त्वाच्या उपचार तत्त्वांची माहिती दिली. इलाज-बिल-गिझा (आहारोपचार): योग्य आहारानेच अनेक रोगांवर नियंत्रण ठेवता येते. इलाज-बिल-तदबीर (जीवनशैली उपचार): व्यायाम, मालिश, हिजामा (कपिंग थेरपी), स्टीम, विश्रांती इत्यादी पद्धतींनी शरीरशुद्धी व संतुलन साधले जाते. इलाज-बिल-दवा (औषधोपचार) नैसर्गिक वनौषधी व खनिज घटकांपासून तयार औषधे वापरली जातात.


कोणत्या आजारांमध्ये उपयुक्त?

युनानी पॅथी विशेषतः त्वचारोग, सांधेदुखी, श्वसनाचे विकार, पचनसंस्था विकार, स्त्रीरोग व जीवनशैलीजन्य आजारांमध्ये प्रभावी ठरते.ही पद्धती रोग बरा करण्यासोबतच रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य संवर्धनावर भर देते.

या कार्यक्रमात डॉ.आनंद मोरे, डॉ.अभिजीत खरटमल, डॉ.स्मिता पाटील यांनीही समन्वयी आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.आरोग्य सेवक  किशोर जगताप, आरोग्य मित्र रणखांब तसेच इन्चार्ज सिस्टर कुलकर्णी व केसकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. युनानी डे निमित्त पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधून निरोगी समाजनिर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. जनतेने आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या युनानी सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 
Top