धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या जीवनात सन्मान, आनंद आणि आशेचा नवा अध्याय लिहिणारा क्षण म्हणजे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत आयोजित मोफत जिल्हास्तरीय बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा. रविवारी, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव येथे हा भावनिक व प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शहरातील छायादीप मंगल कार्यालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता शाही दिमाखात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात एकूण 26 जोडपे विवाहबंधनात अडकली. हुंडा, दिखावा आणि अनावश्यक खर्चाला ठाम फाटा देत सन्मानपूर्वक विवाहाचा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर मांडण्यात आला. नवदांपत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर पालकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.
हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राज्याचे माजी मंत्री व परंडाभूमवाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने यशस्वी झाला. संपूर्ण आयोजन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली काटेकोर नियोजनातून पार पाडण्यात आले.
विवाहप्रसंगी वधू-वरांना मणी-मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधू-वरांचे वस्त्र तसेच रूखवत देऊन त्यांच्या संसाराला भक्कम आधार देण्यात आला. यासोबतच वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या मंगलप्रसंगी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी,सुनील काकडे, भारत इंगळे,अनिल खोचरे,शमशुद्दीन शेख, ॲड अजित खोत, विनोद गपाट, संजय मुंडे,कुणाल निंबाळकर,पंकज भोसले मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुंड्याविना, सन्मानाने आणि सामूहिक आनंदात पार पडलेला हा विवाहसोहळा म्हणजे माणुसकी, समता आणि सामाजिक जबाबदारी यांचा भावनिक संगम ठरला.

