धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी आज एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केला आहे.या आदेशानुसार जिल्ह्यात 16 मे 2025 पासून 3 जून 2025 पर्यंत 'नो फ्लाइंग झोन' जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने ऑपरेशन 'सिंदुर' अंतर्गत देशविघातक संघटनांचे  जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीन तळ उद्ध्वस्त केले असून, या कारवाईचा सूड घेण्यासाठी दहशतवादी संघटनांनी ड्रोनद्वारे हल्ल्यांची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या सूचनेनुसार तातडीने हा आदेश लागू करण्यात आला आहे.

या कालावधीत जिल्ह्यात ड्रोन,रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट,पॅरा ग्लायडर्स,हैंग ग्लायडर्स,हॉट एअर बलून किंवा तत्सम कोणतीही हवेत उडणारी उपकरणे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती,संस्था किंवा संघटनेवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कारवाई केली जाईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 
Top