धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मागील आठवड्यापासून ऐन मे मध्ये जोरदार पाऊस कोसळू लागल्यामुळे जिल्ह्यातील 19 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साचले आहे. तर ओढे, नाल्या, नद्या प्रवाहीत झाल्या आहेत. या पावसामुळे शेतातील अनेक बांध फुटल्याने शेतातील माती वाहून गेली आहे. जिल्ह्यात 28 मे 2025 पर्यंत 245.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 25 वर्षातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद यामुळे झाली आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजनुसार 23 मिमी अपेक्षित पाऊस होता. बदलत्या हवामानानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. 19 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. धाराशिव ग्रामीण, बेंबळी, पाडोळी (आ.), केशेगाव, परंडा तालुक्यातील परंडा, आसु, आनाळा, सोनारी, भूम तालुक्यातील अंबी, वालवड, ईट, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकूर, येरमाळा, मोहा, शिराढोण, गोविंदपूर, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीची बांध फुटून माती वाहून गेली आहे. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. मुसळधार पावसामुळे दिलीप वामन शिंदे रा. एकुरगा ता. कळंब यांच्या शेतातील टरबूजचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
श्रीकांत भिसे यांची बांधलेली विहीर पूर्णपणे जमीनदोस्त झाली. त्याबरोबर अन्य शेतकऱ्यांचे आंबा, टरबूज, पपई अन्य पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ती भरपाई कशानेच भरून निघू शकत नाही असे आमदार पाटील यांनी सांगून संबंधित तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांना पंचनामे करून आपत्ती व्यवस्थापन मधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा सूचना दिल्या आहेत. असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.