भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील वंजारवाडी ग्रामस्थांनी भूम शहराच्या वाढीव पाणीपुरवठा अमृत-2 या योजनेला विरोध करू नये, असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी पत्रकार परिषदेतून केले.

वंजारवाडी येथील आरसोली प्रकल्पातून भूमसाठी अमृत-2 योजना मंजूर आहे. या योजनेमुळे शहराची पाण्याची समस्या सुटणार आहे. परंतु प्रकल्पातून पाइपलाइन करण्यासाठी वंजारवाडीतील काही ग्रामस्थ विरोध करत आहेत. नगरपालिकेने भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करून 1998 मध्ये 2.29 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. सध्या आरक्षित पाण्यापैकी नगरपरिषद एक दशलक्ष पाणी वापरत आहे. त्यामुळे वंजारवाडी ग्रामस्थांनी गैरसमज करून घेऊ नये. शासनाने वाढत्या लोकसंख्येनुसार अमृत -2 ही योजना मंजूर केली. त्यामुळे नगरपालिका केवळ आरक्षित केलेलेच पाणी घेणार आहे. आरक्षित पाणी हे भूम शहरवासीयांचे हक्काचे आहे. शहराला पाणी दिल्याने शेतीला पाणी मिळणार नाही, असा गैरसमज आहे. शासन अगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देते, नंतर शेतीला, असे धोरण आहे. त्यामुळे पाइपलाइनला विरोध करू नये. 

यावेळी माजी नगरसेवक रोहन जाधव, वकिल मंडळाचे अध्यक्ष पंडित ढगे, शिवलिंग शेडगे, सुनील थोरात, बाबा पटेल आदींसह नागरिक उपस्थित होते. दरम्यान, वंजारवाडी ग्रामस्थांनी विरोध केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अमृत-2 योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्णतेसाठी पोलिस बंदोबस्तात काम करण्याची मागणी भूमकरांच्या वतीने करण्यात येणार आहे.

 
Top