धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2026-27 हा सर्वसामान्य, शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि लघुउद्योगांना दिलेले प्राधान्य धाराशिव जिल्ह्यासाठी कायापालट करणारा आहे. उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. कौडगाव व वडगाव एमआयडीसी परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन मिळणार आहे, याचा थेट फायदा शेतकरी व युवकांना होणार आहे. आरोग्य क्षेत्रात कर्करोगावरील औषधांवर दिलेली सवलत ही ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. तसेच तुळजापूर टेम्पल टाउन संकल्पना, तेरचा सांस्कृतिक वारसा आणि नळदुर्ग किल्ला यांना पर्यटन धोरणातून नवी ओळख मिळणार असून, पर्यटनवाढीमुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. सोलर, बायोगॅस व स्वच्छ ऊर्जेला दिलेले प्रोत्साहन शेतकरी व ग्रामीण भागाचा इंधनखर्च कमी करणारे ठरेल. शेती, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारा हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घालणारा आहे, असा विश्वास दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

 
Top