परंडा (प्रतिनिधी)- बाणगंगा सहकारी साखर कारखाना येथे वजनकाट्यात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून स्क्रॅपच्या वजनात फेरफार करत तब्बल 60 ते 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकादम समीर अब्दुल खादेर शेख, संदीपान गीरमकर, सुर्यप्रकाश, सुनिल व इतर पाच इसमांनी 12 डिसेंबर 25 ते 10 जानेवारी 26 या कालावधीत कारखान्यातील वजनकाट्यात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून फेरफार केल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपींनी डीव्हाईसच्या सहाय्याने काटा दूर अंतरावरून ऑपरेट करून वाहनातील स्क्रॅपचे वजन कमी दाखवले. आरोपींनी बनावट वजनाच्या प्रिंट स्लिप्स तयार करून वजन योग्य असल्याचे भासवले. या पद्धतीने अयान मल्टिट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्यातील अंदाजे 150 ते 175 मेट्रिक टन स्क्रॅप कमी वजन दाखवून बाहेर नेण्यात आला. हा स्क्रॅप विनमिन मेटल्स, चेंगाल्लट (जि. कांचीपूरम, तामिळनाडू) येथील मालक सुर्यप्रकाश व त्याच्या चार साथीदारांनी मिळून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
रईस लेक कंपनीच्या सर्व्हिस इंजिनिअरच्या मदतीने वजन काट्यात चिप बसवण्यात आल्याचा संशय असून, या संपूर्ण प्रकारातून कारखान्याची सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फिर्यादी संतोष तुळशीराम तोंडले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.
