धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाडोळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आमोल नागनाथ गुंड (सर), पाडोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमोल उर्फ शंभुराजे शिवाजीराव मस्के तसेच समुद्रवाणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शाहना तौफीक तांबोळी यांच्या प्रचारार्थ रविवारी पाडोळी येथे आकुबाई देवी मंदिरासमोर खासदार ओमराजे निंबाळकर यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, आमोल गुंड हे उच्च शिक्षित, अभ्यासू व विकासाभिमुख उमेदवार असून त्यांना रुपामाता परिवाराचा ठाम पाठिंबा आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले हे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना (उबाठा) ची सत्ता आल्यास शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येतील, असे सांगताना त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी 500 नव्या वर्गखोल्यांची उभारणी, प्राथमिक शाळांमध्ये सेमी-इंग्रजी शिक्षण, तसेच शाळांचे डिजिटलीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यासोबतच शेतकरी, ऊस उत्पादक, दूध उत्पादक, असंघटित कामगार व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

याच सभेत रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा युवा नेते अँड. अजित गुंड-पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून गुंड परिवाराने ऊस उत्पादक व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि विकासाची नवी दिशा दिली आहे. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून उभारलेले औद्योगिक उपक्रम हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरले असून, यापुढील काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांना योग्य न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारांना आवाहन करताना खासदार निंबाळकर म्हणाले, “मशीनला दोष देऊ नका. शांततेत मतदान करा. गोंधळून जाऊ नका. चिन्ह पाहून मशालीला मतदान करा. एक-एक मत महत्त्वाचे आहे; ग्रामीण जनता सुज्ञ आहे.”या जाहीर सभेस व्यासपीठावर तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, रवींद्र देठे, सतीश जावळे, राजकुमार झिरमिरे, विकास ढवळे, मंगेश दळवे, उत्तम महाराज बोचरे अँड. शरद गुंड यांच्या सह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top