तुळजापुर (प्रतिनिधी)- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी आज सकाळी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक महापूजा केली. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर या आपल्या परिवारासह सकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी शहरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी श्रद्धेने देवींची अभिषेक महापूजा केली व देवींच्या चरणी ओटी अर्पण केली.

चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त देवींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. चैत्र पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व संस्थानच्या कामकाजाचे कौतुक केले.

मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, भाजप नेते गुलचंद व्यवहारे, मंदिर संस्थानचे लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, गणेश निर्वळ, अभिजीत तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषिकेश पराडे, ऋषिकेश पाटील व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top