विकास उबाळे
कसबे तडवळा (प्रतिनिधी)- दळणवळणासाठी वाहतूक साधने वाढली आहेत. मात्र, वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याने शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात त्याचे धडे देणे आवश्यक बनले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे होऊन गेली, गेल्या 77 वर्षात वाहतुकीमध्ये कमालीचा बदल घडताना दिसत आहे. दळणवळणाची साधने वाढलेली आहेत. चौपदरी, सहापदरी अशा प्रकाराचे महामार्ग सध्या आपल्याला पहायला मिळत आहेत. परंतु, वाढत्या वाहतुकीची संख्या पाहता वाहन चालकांकडून नियमांचे पालन मात्र होताना दिसून येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण ही वाढले आहे.
वाहतुकीचे नियम तसे मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व नियम एकदाच लक्षात ठेवणे कठीण आहे. त्यामुळे शाळेच्या पाठ्यपुस्तकात प्रत्येक वर्षी एक धडा आणल्यास त्याचा फायदा येणाऱ्या नवीन पिढीला नक्कीच होईल. नियमांचे पालन होईल. वाहतुकीचे नियमांचे धडे जर शालेय पाठ्यपुस्तकात आणले तर येणाऱ्या नवीन पिढीकडून याचे पालन होईल. लहान वयातच मुलांना नियम माहिती मिळेल तसेच नियमांचे पालन झाल्यास आगामी काळात वाहतुकीची कोंडी तसेच अपघात कमी होतील.
“सध्या अल्पवयीन मुले-मुली वाहने सुसाट वेगाने चालवतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना मोटारसायकल किंवा कार असे वाहन चालवण्यास देऊ नये. पोलिस यावर लक्ष देऊन आहेतच पण मुलांना शाळेत त्यांच्या अभ्यासातच वाहतुकीचे नियम दिले पाहिजे म्हणजे लहानपणापासून त्यांच्यात जागरूकता निर्माण होईल.“
(विलास हजारे, सहा पोलीस निरीक्षक, ढोकी.)
“आज रस्त्यावर 18 वर्षाखालील मुले, मुली गाड्या चालवताना दिसतात. गाडी चालवणे त्यांना सोपे वाटते. परंतु वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली त्यांच्याकडून होत असते. कसल्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम त्यांना माहीत नसतात. जर अभ्यासक्रमात वाहतुकीचे नियम समाविष्ट केले तर निश्चित त्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होईल.“
(संतोष देशपांडे, अध्यक्ष धाराशिव जिल्हा शिक्षक संघ)
पाचवीपासून पाठ्यपुस्तकात धडे आणण्याची गरज
सध्यातरी आपल्या देशात पाचवी, सहावीची मुले-मुली सर्रास दुचाकीचा वापर करतात. जर इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी एक धडा पाठ्यपुस्तकात आणला तर वाहतुकीचे नियम मुलांना लहानपणापासून माहीत होतील.