धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेतून मराठा समाजातील वधू- वरांसाठी रविवारी (दि.13) मोफत राज्यस्तरीय सूचक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल 2260 इच्छुक वधू आणि वरांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. तर या मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे 6 हजारांवर नोंदणी झाली आहे. धाराशिवच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा पार पडला असून, या आयोजनाबद्दल कौतुक करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच आमदार कैलास पाटील यांनी संयोजकांचे आभार मानले.
शहरातील जिजाऊ चौक येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यास धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, परळी, बार्शी, अहिल्यानगर,नागपूर, फलटण, सातारा, बारामती आदी भागातून मराठा समाजाचे वधु-वर व पालक सहभागी झाले होते.
पहिल्या सत्राचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात वधू-वर परिचय पत्र स्वीकारून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने दुसऱ्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात पहिल्या सत्रात वधू-वर नोंदणी व दुसऱ्या सत्रात वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्याच्या माध्यमातून वधु वर मंडळीनी एकमेकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांचे विवाह जुळून आले. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अशोक गायकवाड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुधीर पाटील, विक्रम पाटील,उमेश राजेनिंबाळकर,पत्रकार चंद्रसेन देशमुख, प्रीतम बागल, तानाजी जाधव आदी उपस्थिती होती.
मेळाव्याचे संयोजन प्रा.अभिमान हंगरगेकर,विजयकुमार पवार, प्रा.नवनाथ पवार, राजाभाऊ जगताप,उमाजी गायकवाड, मुकुंद घाडगे, संजय मगर, कैलास तुकाराम पाटील,अशोक चव्हाण,सतिश ढेकणे,महादेव भोसले, दत्तात्रेय भोसले, अर्जुन जाधव,सतिश पवार, कमलाकर मुंडे,लखन मुंडे, अशोक गायकवाड,अमोल निंबाळकर,गोरोबा लोंढे, नवनाथ काळे,तानाजी बिरंजे, रमेश सपाटे,राजू तांबे यांनी केले होते. यावेळी सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.