धाराशिव (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर बाल विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. दरम्यान, बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील दडलेल्या कलांना वाट मोकळी करून देत उपस्थितांना खिळवून सोडले.
धाराशिव शहरातीत तालीम गल्लीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर बाल मंदिर प्राथमिक शाळा व कर्मवीर बाल संस्कार बालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक स्नेह सम्मेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक बाबा मुजावर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरफराज काझी, सखी सावित्री प्रतिनिधी सोनाली होळकर, पालक प्रतिनिधी खालिद पठाण, वाशी येथील कर्मवीर बाल संस्कारचे मुख्याध्यापक माने, धाराशिव येथील कर्मवीर बाल संस्कारचे मुख्याध्यापक उकरंडे, शिक्षिका एम.बी. कोकाटे, तौर आदी उपस्थित होते. यावेळी उजेन जावेद सय्यद विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, एमटीएस, केटीएस, प्रज्ञाशोध परीक्षा, गीत गायन स्पर्धा उपक्रम राबविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बालवाडी व शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रारंभी देवा श्री गणेशा वंदना.... मै निकला गड्डी लेके... झुकेगा नही साला पुष्पा.... टुकूर टुकूर... येळकोट येळकोट, जय मल्हार....बम बम बोले... छोटा बच्चा... कोळी गीते व देशभक्तीपर गीते तसेच प्लॅस्टिकचे दुष्परिणाम... बालवाडीच्या तर मोबाईलचे दुष्परिणाम चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. विविध कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत त्यांची मने जिंकली. प्रस्ताविक शितल देशमुख यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका शुभांगी गायकवाड यांनी व उपस्थितांचे आभार सोमवंशी यांनी मानले. या सोहळ्यास शिक्षिका गुत्तेदार, मसारे, वाघे, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.