धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच प्रकार तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील एका शेतकऱ्याची रेणू ग्रीन एनर्जी सोल्युशन लिमिटेड यांनी कराराप्रमाणे ठरलेली रक्कम संबंधित शेतकऱ्याला देण्यासाठी टाळाटाळ केली. तर वारंवार मागणी केली असता तुम्हाला काय करायचे ते करा असा दम दिला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे दि.22 एप्रिल रोजी केली आहे. दरम्यान, न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील किरण नामदेव बिराजदार यांची चिवरी शिवारात गट नं. 93 मध्ये सामायिक जमीन आहे. रेन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मनोरा व वाहिनीचा पट्टा त्या क्षेत्रामधून नेला आहे. या कंपनीने बिराजदार यांच्याशी 14 लाख रुपयांचा भरपाई व जागेचा मोबदला देण्याचा करार केलेला आहे. त्यापैकी 12 लाख 50 हजार रुपये दिलेले आहेत. मात्र उर्वरित दीड लाख रुपये देण्यास कंपनी वारंवार टाळाटाळ करीत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याला संपर्क केला असता आम्ही तुम्हाला राहिलेली रक्कम देऊ शकत नाही तुम्हाला जे करायचे ते करा अशा प्रकारची उद्धट भाषा वापरून शेतकरी बिराजदार यांचा अवमान व अपमान करीत आहेत. सध्या दवाखान्याच्या खर्चासाठी पैशाची नितांत गरज आहे. मात्र माझे राहिलेली रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ करीत असल्यामुळे बिराजदार यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे करारनामा पाहून त्यानुसार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.


 
Top