धाराशिव (प्रतिनिधी)- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढवण्याबाबतचे महत्त्व पटवून द्यावे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतक-यांनी जलतारा सारख्या उपक्रम राबवून भुजल पातळी वाढविण्यासाठी राज्य शासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
राज्यातील नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्तव पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने दि. 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा‘ साजरा केला जात आहे. याअनूषंगाने धाराशिव जिल्ह्यातील “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025” या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे हस्ते दि.15 एप्रिल 2025 रोजी सिंचन भवन सभागृह, आनंदनगर येथे करण्यात आला. सदर कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ धाराशिव विजय थोरात, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, प्रा. डॉ. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा या विशेष मोहीम स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी व यंत्रणानी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी व प्रा.डॉ. नितीन पाटील, सहयोगी प्राध्यापक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विज्ञापीठ उपपरीसर, धाराशिव यांनी मार्गदर्शन केले. जलव्यवस्थापन कृती पंधरवडा या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करणे व पाटबंधारे महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करणे याबाबतची जलसंपदा विभागाची भुमिका विजय थोरात, अधीक्षक अभियंता यांनी उपस्थित लोकांना सांगितली.
कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी आपल्या समारोपीय भाषणामध्ये जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठीच्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातील उपक्रमामध्ये शेतकरी/विविध संघटना व संस्था यांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याबाबत व प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.
महत्वपूर्ण विषय
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा साजरा होत असताना माध्यम प्रतिनिधींना मात्र यामध्ये सहभागी करून घेतले नाही. एवढा महत्वपूर्ण विषय असताना नेहमीप्रमाणे कार्यक्रम करून प्रेस नोट पाठविली गेली. या प्रेस नोटमध्ये बातमीची भाषाही व्यवस्थित नसल्याने बातमी निट करून माध्यम प्रतिनिधींना छापावी लागते.