धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी माता, तीर्थक्षेत्र तुळजापूर, तुळजापूर शहरातील माता-भगिनी आणि जगदंबेची मनोभावे सेवा करणाऱ्या पुजारी वर्गाची बदनामी करण्याचे व्यापक षड्यंत्र रचले जात आहे. काही समाजकंटक प्रवृत्तीच्या माध्यमातून सातत्याने जाणीवपूर्वक ड्रग्ज प्रकरणावरून बदनामी केली जात आहे. तथ्य नसलेल्या बाबींना दूषित दृष्टीने प्रकाशित करून कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र, तुळजापूरतील माताभगिनी आणि पुजारी बांधवांची सातत्याने बदनामी करणाऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

तुळजापूर शहरातील नागरिकांनी  एकत्रित येत शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी आणि पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना निवेदन दिले. ड्रग्ज प्रकरणावरून काही माध्यमकर्मी आणि तथाकथित सजग नागरिक तुळजापूर आणि तुळजापूरतील माता-भगिनींसह पुजारी वर्गाची जाणीवपूर्वक बदनामी करीत असल्याचे म्हटले आहे. तुळजापूर पोलिसांनी 14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथे सापळा रचून विक्रीसाठी आणले जात असलेले ड्रग्ज पकडले होते.

त्यानंतर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकरणाची उकल करत मुंबई पासून असलेले लागेबांधेही शोधून काढले आहेत. असे असताना कांही तथाकथित पत्रकार व तथाकथित सामजिक कार्यकत्यांनी तथ्यहीन आणि अवमानकारक बातम्या प्रसारित करून त्या व्हॉट्स अप सह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता, श्री क्षेत्र तुळजापूर व पुजारी बांधव यांची बदनामी करण्याचे हे व्यापक षड्यंत्र आहे. त्यामागे कोण आहेत याचा छडा लावण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.

सुरुवातीला तुळजापूर शहरात दीड ते दोन हजार युवक ड्रग्ज सेवन करत असल्याची धादांत खोटी बाब वारंवार चर्चेत आणली गेली. परिणामी निष्पाप युवकांची नाहक बदनामी झाली आहे व राज्यभरात त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात नैराश्याची भावना तयार झाली आहे. त्यानंतर “सेक्स करण्यासाठी व लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी तुळजापुरात ड्रग्सचा सर्रास वापर केला जात असल्याचे खोडसाळ वृत्त समाजात पसरविण्यात आहे.

त्याला व्यापक प्रसिद्धी देत श्री. क्षेत्र तुळजापूर शहरातील माता-भगिनींबद्दल अत्यंत संतापजनक आणि बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित केला गेला. एकप्रकारे तुळजापूर शहरातील समस्त मातृशक्तीचा विनयभंगच करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यापाठोपाठ “आदेश- ड्रग्ज तस्करीतील आरोपी पुजाऱ्यांवर होणार ही कारवाई, तुळजाभवानी मंदिर प्रशासन ॲक्शन मोडवर“ अश्या मथळ्याखाली पुजारी वर्गाशी संबधित वृत्त दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी समाजमाध्यमातून पसरविले गेले आहे.

याबाबत मंदिर प्रशासनाकडून खातरजमा केली असता असे कांहीही घडले नसल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविकपणे ड्रग्ज प्रकरणांमध्ये कायम तीन पुजारी मंडळाने पुढाकार घेऊन हे प्रकरण उचलून धरलेले आहे. तरीदेखील पुजारी वर्गाची जाणीवपूर्वक बदनामी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अशा प्रकारे कुठलाही ठोस आधार नसताना मागील दोन महिन्यांपासून कांही लोक चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता, श्री क्षेत्र तुळजापूर व पुजारी वर्गाच्या बदनामीचे व्यापक षड्यंत्र राबविले जात आहे. वास्तविक पाहता पोलिस प्रशासनाने कुठलाही अभिनिवेश न बाळगता यात ज्यांचा सहभाग आहे अशांवर कारवाई केलेली आहे.

असे असताना याप्रकरणी कांही तथाकथित सामाजिक कळवळा असलेले लोक व कांही पत्रकारांनी जाणीवपूर्वक रोज हे प्रकरण चर्चेत ठेवले आहे. यासाठी त्यांनी वारंवार निवेदन देणे, पत्रकार परिषदा घेणे, खोट्या बातम्या प्रसारित करणे. आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया घेऊन त्याबाबत वृत्त प्रसारित करणे असे प्रकार टप्प्याटप्याने चालवले आहेत.

सुरुवातीपासून आतापर्यंत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचे निरीक्षण केले असता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीदेवी व मातेच्या पुजारी वर्गाच्या बदनामीचे हे एक व्यापक षडयंत्र असल्याची बाब अधोरेखित होत आहे.जी की अतीशय गंभीर असून यामुळे तुळजापूर शहरातील नागरिक, महिला पुजारी व भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

आम्ही सर्व तुळजापूर शहरातील नागरिक आपणस नम्र निवेदन करतो की आपण या बदनामी प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांची चौकशी करून त्यांचे कॉल रेकोर्ड, वॉट्सपवरील कॉल व आर्थिक व्यवहार तपासून या बदनामीकारक खोडसाळ बाबींना कोण पाठबळ देत आहे? हा पेड न्यूजचा प्रकार तर नाही ? याची चौकशी करावी व संबंधितावर तातडीने कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे. त्यावर सचिन रोचकरी, निलेश रोचकरी, आनंद कंदले, शांताराम पेंदे, संदीप गांगणे, राजेश्वर कदम, बाळासाहेब भोसले, नानासाहेब डोंगरे, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, रामचंद्र रोचकरी, इंद्रजीत साळुंके आदींच्या सह्या आहेत.

 
Top