धाराशिव  (प्रतिनिधी) - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शाहीर सीमा पाटील व जॉली मोरे यांनी एकापेक्षा एक सरस नाट्यमय कृतीद्वारे शिव-भीम गीतांच्या माध्यमातून सर्व स्त्री- पुरुष महापुरुषांचा जाज्वल इतिहास आपल्या प्रबोधनात्मक कलात्मकतेतून प्रेक्षकांसमोर मांडून त्यांना मंत्रमुग्ध केले. तर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांनी देखील प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये भरभरून दाद देत महापुरुषांचा इतिहास आपल्या नैनामध्ये दि.७ एप्रिल रोजी कैद केला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे व धनंजय राऊत यांनी 'WE THE PEOPLE' संगीतमय महानाट्य एक निळा, एक भगवा शिव-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन लेडीज क्लबच्या मैदानावर केले होते. याचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, विश्वास शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, राजाभाऊ शेरखाने, जिप माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रदीप मुंडे, आशिष मोदाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाहीर सीमा पाटील, जॉली मोरे व त्यांच्या टिमने तथागत गौतम बुद्ध यांनी डाकू बनलेल्या अंगुली माल यास पुन्हा कशा पद्धतीने सामान्य माणूस बनविले ? तर छत्रपती शिवरायांना बालपणीच राजमाता जिजाऊ यांनी लढाईचे धडे कसे दिले आणि शिवाजी राजांनी स्वराज्य कसे निर्माण केले ? तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना कसे सळो की पळो करून सोडले ? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार चालवून महिला देखील प्रशासक कशा असतात ? हे दाखवून दिले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापितांचा कडवा विरोध झुगारून मुलींसाठी कशी शाळा सुरू केली ? माता रमाई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केल्यामुळेच ते कसे संविधान निर्माते झाले ? याबरोबरच संत मदर टेरेसा, अंतराळवीर कल्पना चावला यांचा नाट्याच्या माध्यमातून चित्तथारारक इतिहास गीतांद्वारे सादर केला. तसेच पिढ्यान पिढ्या केलाय आमचा तोटा.... भिमा मुळे आता मावत नाहीत खिशात नव्हता... झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा.... शोधू कुठे रं, माझ्या राजा.... गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल.... माझ्या भिमाच्या नावानं, कुंकू लावल रमानं..... नांदेड नांदेड माझ्या रमाच नांदण.. भीम कैवारी पेटला.... घर घर ते बाई जातं, पहाटेच्या पारी... वाचतो डोंबारी...जिजाऊ-सावित्री-रमाई...बना गं... आधी सह विविध क्रांतिकारी गीताच्या माध्यमातून प्रबोधन केले. उपस्थितांनी देखील क्षणोक्षणी टाळ्यांची दाद देत या कार्यक्रमाचा उत्साहामध्ये मनमुराद आनंद लुटला.

 
Top