कळंब (प्रतिनिधी)- डिकसळ परिसरातील छ. संभाजी नगर येथे राहणाऱ्या 4 वर्षांच्या अशर शहाबाज पठाण याच्या व्हिडीओची चर्चा सध्या जोरात आहे. त्याचे कारण म्हणजे घराशेजारील अंगणवाडीत जाणाऱ्या अशरला श्लोक अगदी तोंडपाठ आहेत. शाळेत शिक्षकांनी शिकवलेले सगळे श्लोक तो त्याच्या बोबड्या आवाजात पूर्ण म्हणून दाखवतो. 

'सदा सर्वदा योग तुझा घडावा' ते जय जय रघुवीर समर्थपर्यंत आपल्या बालभाषेत अशर न चुकता श्लोक पूर्ण म्हणून दाखवतो. इतकंच नाही तर जेवायच्या आदी हात जोडून श्लोक म्हणून पुन्हा दुआचा हात पुढे करत 'बिस्मिल्लाह आला बरकतिल्लाह' म्हणतो आणि मगच पहिला घास घेतो. यात तो भारतीय गंगा-जमुना सांस्कृतिचा प्रतेय घडवून आणून देतो. मागील 6 महिन्यापासून अंगणवाडीत जाणारा अशर शाळेत खुर्चीवर चडून त्याच्या बालमित्रांना एबीसीडी, बाराखडी शिकवतो हे विशेष. इतरही श्लोक त्याला विचारल्यास तो लगेच म्हणून दाखवतो. शाळेत जाधव मॅडम आणि दीक्षित मॅडम यांनी आपल्याला शिकवलं हे तो अभिमानाने सांगतो. वडील शहाबाज पठाण आणि आई यास्मिन पठाण घरी आल्यास त्याचा न चुकता अभ्यास घेतात. त्याच्या पालकाचे म्हणणे आहे की, भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. आम्ही ज्या भागात राहतो तिथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे आमच्या मुलाने सर्व धर्माचा आदर करत त्याचा अभ्यास करायला पाहिजे, असे आम्हाला वाटते. शाळेत शिकलेल्या गोष्टी तो त्याचे मामा मुस्तान मिर्झा यांना फोनकरून न चुकता सांगतो. असेच त्याने म्हणलेल्या श्लोकचा व्हिडीओ त्याच्या मामाने सोशल मीडियावर चांगला संदेश पसरवण्यासाठी टाकला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला अनेक चांगल्या प्रतिक्रियाचे कॉल-मेसेजस आले. असे अशरचे पालक सांगतायत. इतकेच नाही तर श्लोकसह अशरला पवित्र कुराणातील आयत आणि सुराहही तोंडपाठ आहेत. त्याच्या या वागणुकीचा आम्हाला अभिमान आहे, असे त्याचे पालक सांगतात.

 
Top