कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील पुरातन दीडशे वर्षांपूर्वीच्या श्री बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून यासाठी नवीन भव्य मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. या नवीन मंदिरात तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थान येथून आणलेली श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांची सव्वासात फूट उंच आणि सव्वादोन फूट रुंद मूर्ती प्रतिष्ठापना रविवारी (ता. 20) करण्यात आली. हैदराबाद येथील यज्ञाचार्य मंगलागिरी यादगिरी स्वामी आचार्य व त्यांच्यासमवेत असलेल्या पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
या मुख्य बालाजी मूर्तीसोबत पंचधातूच्या श्रीनिवास, भूदेवी, श्रीदेवीच्या मूर्तीदेखील आणण्यात आलेल्या आहेत. द्वारपाल जय- विजय, गरूड, हनुमान, महादेव, नंदी अशा एकूण 11 मूर्तीची स्थापनाही याच वेळी करण्यात आली. या मंदिरात राम प्रपन्नाचार्य (मोनू महाराज) कायमस्वरूपी येथील मंदिराची देखभाल व पूजा पाठ करणार आहेत. कळंब शहरातील शहरातील जुनी बाजारपेठ सोनार लाइन भागात स्थित भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सुमारे दीडशे वर्षे पुरातन श्री बालाजी मंदिर आहे. मंदिराची देखभाल करण्यासाठी श्री बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट कळंब या नावाने नोंदणीकृत ट्रस्ट स्थापन केलेला असून याद्वारे या पुरातन मंदिराची देखभाल करण्यात येते. सध्या लोकसहभागातून मंदिर जीर्णोद्धार काम पूर्ण करण्यात येत आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे
बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीने केलेले असून, 41 फूट उंच नक्षीकाम करण्यात आले आहे. येथील गोपूर प्रवेशद्वार हे विशेष आकर्षण आहे. मंदिरामध्ये विष्णू दशावतार, प्रशस्त गर्भगृहासमोर मोठे सभागृह आहे विविध देवतांच्या आकर्षक कलात्मक व विविध भावमुद्रेतील मूर्ती शिखर आणि बाजूच्या भिंतींवर साकारल्या आहेत. दिवसभर श्री व्येंकटेश बालाजी भक्तांनी मूर्तींचे दर्शन घेतले यानिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट कळंब व समस्त श्री बालाजी भक्तगण कळंब यांनी परिश्रम घेतले.