तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील ड्रग्ज प्रकरण तपास आता स्थानिक पातळीवर पोहचला आहे. ड्रग्स  प्रकरणात आता पोलिसांनी निष्पन्न झालेल्या संशयित आरोपींच्या संपर्कात असलेल्या तसेच बँक व्यवहार झालेल्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये जवळपास ऐंशी जणांचा समावेश आहे. या यादीत तरुणाईचा समावेश आहे. काही महिलांना ही या प्रकरणी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते. सदरील महिला या त्यांच्या जवळच्या मंडळीनी केलेल्या बॅक ट्राँजेक्शनमुळे यांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागत आहे. 

ड्रग्ज प्रकरणी मागील दोन वर्षापुर्वी कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. अनेकांचे संसार, आयुष्य उध्दवस्त झाले नसते. विशेष तिर्थक्षेञ तुळजापूरची बदनामी टळली असते. या प्रकरणी पोलिस प्रत्येकाचा शोध घेवुन प्रत्यक्ष घरी जावुन नोटीसा बजावत आहेत. या नोटीसा बजावलेल्या अनेक मंडळी विनाकारण अडकल्याने गोत्यात आले आहेत. यातील दोषी नसणारी पण नोटीस आलेली मंडळी पोलिसांना भेटुन खुलासा देत आहेत.


35 पैकी 14 आरोपी पकडले, 21 फरार

तुळजापूर शहरात सुरू असलेल्या ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांना सुरुवातीला तामलवाडी येथे ड्रग्ज पकडण्यात यश मिळाले होते. त्यानंतर या भल्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला. यामध्ये आत्तापर्यंत 35 आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये 14 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील चार जण पोलीस कोठडीत असून दहा जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. तर 21 जण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनी या संशयित आरोपीच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी सुरू केली असून कॉल रेकॉर्ड व बँक स्टेटमेंट च्या  माध्यमातून ही चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्ज रँकेट दिवसेंदिवस खोलवर मुळाशी जात आहे. 

 
Top