धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर पोलिसांनी बार्शी येथे मोठी कारवाई करीत ड्रग्ज, गावठी पिस्टलसह 3 जणांना अटक केली आहे. अटक 3 आरोपी पैकी 2 धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील असून, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्या ड्रग्ज पकडले असून, हे ड्रग्ज कुठून आणले होते व कोणाला दिले जाणार होते याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिस अधिक्षक अतुल कलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण उघडकीस येवून दोन महिने झाले असताना परत एकदा धाराशिव जिल्ह्याची लिंक ड्रग्ज प्रकरणात लागल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आरोपींवर कारवाई करीत बाजी मारली. आता बार्शीचे धागे कुठपर्यंत आहेत हे समोर येणे गरजेचे आहे. तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचा धाराशिव पोलिस तपास करीत आहेत. यापूर्वी एकदा परंडा येथे ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र प्रयोगशाळा तपासणीत ते ड्रग्ज नसून कॅल्शियम क्लोराईड असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गैरसमजीतून गुन्हा दाखल केल्याने गुन्हा रद्द करण्याची शिफारस धाराशिव पोलिसांना करायची नामुष्की आली. त्यावर 24 एप्रिलला सुनावणी आहे. बार्शी येथे आता परंड्यातील 2 जण अडकले असल्याने धाराशिव पोलिसांना संधी आहे.
परंडा रोडवरील स्वराज हॉटेल समोर बुधवारी 17 एप्रिल रोजी रात्री 11.30 च्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 13 लाख 88 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये असद हसन देहलूज (वय 37, रा. पल्ला गल्ली, परंडा), मेहफुज महंमद शेख (वय 19, रा. बावची, परंडा) आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय 32, रा. काझी गल्ली, बार्शी) यांचा समावेश आहे. असद देहलूजकडे 9019 ग्रॅम ड्रग्ज 5 पुड्या व पिस्टल, मेहफुज शेख कडे 5.73 ग्रॅम ड्रग्ज 2 पुड्या व सरफराज उर्फ गोल्डी कडे 5.12 ग्रॅम 3 पुड्या असे 20 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले.