कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या निवडणुकी च्या आरक्षण प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 16 एप्रिल बुधवार रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी,संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष आमंत्रित करण्यात आले आहेत.कळंबचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या लोकशाही प्रक्रियेत सर्वपक्षीय सहभाग आणि पारदर्शकता राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सर्व गावचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या बैठकीसाठी उपस्थित राहावे. असे आवाहन कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.