धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वरवंटी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मूर्तिप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त वरवंटी येथे हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन 3 ते 10 एप्रिल या कालावधीत करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात नामवंत कीर्तन व प्रवचनकारांची सेवा होणार आहे. सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वरवंटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
हभप अॅड. पांडुरंग लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या सप्ताह कालावधीत सकाळी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी महिला हरिभजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवार 3 एप्रिल रोजी सकाळी लोमटे महाराज यांचे कीर्तन होईल. 4 एप्रिल रोजी भागवताचार्य अनिल महाराज यांचे कीर्तन, 5 एप्रिल रोजी हभप गणेश महाराज क्षीरसागर (कामठा) यांचे कीर्तन, 6 एप्रिल रोजी हभप योगेश बप्पा इंगळे (दारफळकर) यांचे रामनवमी गुलालाचे कीर्तन, 6 एप्रिल रोजी हभप देविदास माहाराज निवळीकर, 7 एप्रिल रोजी हभप संतवीर बंडातात्या कराडकर (पंढरपूर), 8 एप्रिल रोजी हभप भागवत महाराज कबीर (पंढरपूर), 9 एप्रिल रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार, 10 एप्रिल रोजी हभप अर्जुन महाराज लाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. तर कालिदास अर्जुन देडे यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सप्ताह कालावधीत व्यासपीठ चालक म्हणून विजय विठ्ठल पवार हे काम पाहणार आहेत. सप्ताहासाठी वरवंटी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. या सप्ताहाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.