तुळजापूर (प्रतिनिधी)- कोल्हापूरच्या छत्रपती राजघराण्यातील युवराज छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सायंकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा केली.
रूढी परंपरेप्रमाणे श्रीतुळजाभवानी देवीच्या गर्भग्रहामध्ये जाऊन छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटुंब कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा केली. तत्पूर्वी त्यांनी श्रीतुळजाभवानी देवीची ओटी भरली. अभिषेक महापूजेच्या वेळी मालोजीराजे यांच्या मातोश्री यज्ञसेनिराजे शाहू छत्रपती, पत्नी
मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती, यशस्विनीराजे व यशराजराजे हे छत्रपती राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते.
तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी मंदिर संस्थानच्या वतीने श्रीतुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र देऊन रूढी परंपरेप्रमाणे छत्रपती घराण्यातील सदस्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, ऋषभ रेहपांडे, दीपक शेळके व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.